मैदानात कोल्हा आला आणि सामना थांबला, थेट क्रिकेटच्या पंढरीला घातली प्रदक्षिणा! पाहा Video

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानामध्ये बसून सामना पाहण्याचा आनंद घेण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो रुपये खर्च करून क्रिकेटवेडे लॉर्ड्सवर येऊन सामन्याचा आनंद घेतात. परंतु या सर्व क्रीडा प्रेमींना चपराक देत अगदी मोफत लॉर्ड्सच्या मैदानात प्रवेश केलाय तो एका कोल्ह्याने. ‘The Hundred’ लीगमधला सामना सुरू असताना अचानक कोल्हा आला आणि त्याने संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा मारली. यामुळे काही वेळासाठी सामना थांबवावा लागला होता.

लॉर्ड्समध्ये द हंड्रेडच्या या हंगामातील पहिला सामना लंडन स्पिरिट आणि ओव्हल इनव्हिन्सिबल यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरू असताना अचानक कोल्ह्याने मैदानात एन्ट्री मारली आणि संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर स्वत:च कोल्हा मैदानातून बाहेर गेला. कोल्ह्याने मैदानात प्रवेश घेतल्यामुळे सामना काहीवेळ थांबवावा लागला तसेच चाहत्यांनी सुद्धा कोल्ह्याने मैदानामध्ये प्रवेश करताच एकच आवाज केला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.