
>>प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे
महानोर, नामदेव धोंडो (16 सप्टेंबर 1942) कवी, कादंबरीकार. शेती हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असणाऱ्या महानोरांची कविता प्रकटली ती ‘हिरव्या बोलीचा शब्द’ होऊन. ‘रानात प्राण गुंतलेल्या’ या कवीच्या प्रारंभीच्या कविता ‘रानातल्या कविता’ (1967) या संग्रहात आहेत. त्यातील निसर्ग प्रतिमांचे काव्यरूप रसिकांच्या मनावर ठसले. ‘निसर्ग’ आणि ग्रामीण संस्कृती हा त्यांच्या कवितेचा जिव्हाळय़ाचा विषय. त्यांची कविता ही बालकवींप्रमाणे ऐंद्रिय अनुभूतीची असल्याने ती त्याच्या सुखदुःखाने आविष्कृत होते. उत्कट संवेदन क्षमता घेऊन रंग गंध स्पर्शादी संवेदनांनी ती सशब्द होते. निसर्गाचा लावण्योत्सव म्हणजे ना. धों. महानोरांची कविता. लोकगीतांच्या बाजातून कवितेची शब्दप्रतिमा शोधणाऱ्या महानोरांची काव्यशैली बोली भाषेतील सहजता, अकृत्रिम गोडवा, लय-नाद आणि रसप्रवाहित्व हे विशेष, अंगभूतपणे घेऊन आली आहे. त्यांनी कवितेच्या लयीचे अनेक प्रयोग केले ते त्यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ या नव्या कथनसंग्रहात आहेच.
वही (1970) या संग्रहातील लावण्या, वह्या ‘जैत रे जैत’, ‘एक होता विदूषक’, ‘सर्जा’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘अबोली’, ‘उरुस’, ‘अंजिण’, ‘फलक’ या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली ‘कवितात्म-गीते’ अविस्मरणीय आहेत. चित्रपटाबाहेरची गाणी म्हणजे ‘यशवंतराव’, ‘माझ्या आजोळची गाणी’, ‘दूरच्या रानात’, ‘माझी मुलगी’, ‘गाथा शिवरायाची’, ‘पालखीचे अभंग’, ‘गगनाला पंख नवे’, ‘फिटे अंधाराचे जाळे आणि इतर’, ‘नाव माझं शामी’, ‘गंध मातीचा’, ‘जरा अस्मान झुकले’, ‘शेवंतीचं बन’, ‘बहरलेलं झाड तरीही’ ही अशी गाणीही लावण्यमय आहेत. पावसाळी कविता (1982), प्रार्थना दयाघना (1990), पक्ष्यांचे लक्ष थवे, अजिंठा (खंडकाव्य 1984), पानझड, तिची कहाणी, पळसखेडची गाणी (लोकगीतांचे संलकन 1982, पुन्हा कविता, पुन्हा एकदा कविता (1945 ते 1980 निवडक मराठी कवितांची संपादने, गांधारी (कादंबरी 1982), गद्यरूप (1972), गावाकडच्या गोष्टी (1981) लोककथा संग्रह – या साऱ्यातून त्यांचे कवितेशी, ग्रामीण लोक जीवनाशी, लोकसाहित्याशी असणारे अकृत्रिम नाते स्पष्ट होते. गाणं, कविता, शब्दकळा, लय, गीत, संगीत याचं बीज पेरणारी महानोरांची लोकसंस्कृती पळसखेडमध्ये आहे. 1961-62 पासून ना. धों. महानोर कविता-गीत लेखनाकडे कसे वळले, कोणकोणते टप्पे अनुभवले याचे कथन ‘कवितेतून गाण्याकडे’मध्ये आहे.
कमी शब्दांत निसर्ग प्रतिमांमधून साकार होणारी त्यांची कविता अधिक काही सांगत नाही, सूचित करते. मराठी रसिकांनी गायक-गायिका, संगीत दिग्दर्शक यांनी त्यांच्या कवितेला विशेष उंचीवर नेऊन ठेवले. कविता आणि गीत यात फरक न करता कवी महानोर एकसंधपणे लिहितात. चाल हेच गीतांचे/ कवितेचे सामर्थ्य आहे. चित्रपट गीते, ध्वनिमुद्रिकांमध्ये त्यांनी मुक्त कविता, लयबद्ध कविता, गाणी समाविष्ट केली आहेत. त्यांची माझी म्हणून निर्मिती प्रक्रिया पद्धती या विषयी आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहावे म्हणून ‘कवितेतून गाण्याकडे’ची रचना झाली आहे. चित्रपटातील व चित्रपटाबाहेरील एकेक गीत घेऊन ना. धों. महानोरांनी ‘बीज कसे अंकुरले’ हे नेमक्या शब्दांत सांगितले आहे. अमूक गीते महानोरांनी का, कसे, कधी लिहिले याची उत्तरे वाचकाला कुतूहलपूर्तीसाठी मिळतात.
खेडय़ातील एक कवी उभ्या महाराष्ट्रभर ललामभूत कसा होतो याची हकिकत अतिशय रंजक आहे. संगीतातल्या निराळेपणाला ‘कवीचे शब्द’ आवाहन करतात आणि काव्यभाव श्रुतीगर्भ, रसमान्य होतो, कवी लोकप्रिय होतो. काव्यगत शब्दाचा आणि संगीतसुरांचा अन्वय तंतोतंत साधणे सहज सुलभ गोष्ट नाही.
चित्रपटगीत लेखक असूनही महानोर ‘कवी’ म्हणूनच कसे उभे राहिले, कसे घडले, कसे कोणाचे सहकार्य झाले, या साऱ्या घटनांचा शोध ‘कवितेतून गाण्याकडे’मध्ये आहे म्हणून हे लेखन आवर्जून रसिकांनी वाचलेच पाहिजे.
कवितेतून गाण्याकडे
लेखक– ना. धों. महानोर
प्रकाशक– पॉप्युलर प्रकाशन,
पृष्ठ– 148, मूल्य– रुपये 250/-




























































