जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए

>>कल्पना राणे

सत्तरीच्या जवळ पोहोचलेले अनेक ज्येष्ठ आपल्याला समाजात दिसतात. जोडीदार गेल्यामुळे किंवा मुले, नातेवाईकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यातले काही जण एकटे पडतात. धडधाकट असूनही काहींची अवस्था केविलवाणी झाल्याचे दिसून येते. अशा अवस्थेत मरण लवकर आले तर बरे होईल असे वाटणारेही बरेच ज्येष्ठ आहेत. जर इच्छामरणाचा कायदेशीर पर्याय मिळाला तर त्यांची होणारी परवड थांबेल का? अशा ज्येष्ठ नागरिकांची दुर्दैवातून सुटका होईल का? वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीने स्वतःहून इच्छामरणाची मागणी केली तर ती कायद्याने पूर्ण केली जावी का? इच्छामरण या विषयामुळे उठणाऱया प्रश्नांवर ‘आता वेळ झाली’ हा सिनेमा विचार करायला भाग पाडतो आणि इच्छामरण हा विषय यानिमित्ताने पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे.

शशीधर लेले (दिलाप प्रभावळकर) व पत्नी रंजना लेले (रोहिणी हट्टंगडी) हे पासष्टी पार केलेले दांपत्य समाधानाने जगत असते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. याच समाधानाने आपल्या आयुष्याची अखेर व्हावी असे या दोघांना वाटत असते, पण तसा निर्णय घेण्याचा त्यांना कायद्याने अधिकार नाही. इच्छामरणासाठी परवानगी मिळावी म्हणून ते जंग जंग पछाडतात. राष्ट्रपती, कोर्टकचेरी एवढेच नाही, तर इतर देशांत जिथे याला मान्यता आहे अशा देशांच्या प्रतिनिधीलाही ते भेटतात, पण गाडी पुढे सरकत नाही. या निर्णयाच्या मार्गात त्यांना वेगवेगळ्या विचार प्रवाहांना सामोरे जावे लागते.

इच्छामरण हा विषय असा आहे की, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, देश, धर्म व समाज याकडे वेगवेगळ्या भूमिकेतून किंवा दृष्टिकोनातून पाहतो. ‘जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में होती है’… ‘आनंद’ सिनेमातला राजेश खन्नाचा हा संवाद सर्वश्रुत आहे. उपरवाल्याने ठरवण्याआधी जर कोणाला इच्छामरण हवे असेल तर? यावर आतापर्यंत आपल्या देशात फक्त उलटसुलट वर्षानुवर्षे चर्चा होत आली आहे. ‘मरण’ या शब्दालाच लोक घाबरतात आणि लेल्यांना वेडय़ात काढतात, पण ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए,’ यावर लेले दांपत्य ठाम असते. कारण शेवट आनंदी हवा असेल तर आपली कहानी कुठे संपवायची हे त्यांना माहीत असते. आजारी पडून अंथरुणावर खितपत न पडता धडधाकट शरीराने त्यांना पूर्णविराम हवा आहे.

‘आता वेळ झाली’चे दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे इच्छामरणावरचे संशोधन तगडे आहे. कारण मनाला पडणाऱया भावनिक-सामाजिक प्रश्नांची उत्तरे सिनेमा जसा पुढे सरकतो तशी मिळत जातात. विषय गंभीर आहे, पण संवेदनशील हाताळणी व हलक्याफुलक्या मांडणीमुळे तो कंटाळवाणा न होता विचार करायला लावतो. संवाद लेखक महेंद्र पाटीलने उत्तम कामगिरी बजावली आहे. गंभीर दृश्यांमध्येही नवरा-बायकोच्या काही संवादांनी हसू फुटतं. अभिनयाच्या क्षेत्रात दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी या दिग्गजांनी बाजी मारली आहे आणि लेलेंना एका उंचीवर नेले आहे. त्यांच्या वयाला शोभेल अशीच भूमिका असल्याने ते खरेखुरे लेले वाटतात. संजॉय चौधरी यांचे संगीत विषयाला साजेसे आहे.

दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे सिनेमे कायम बातमी किंवा हार्ड न्यूज, सत्यघटना अशा विषयांभोवती फिरणारे असतात आणि असे विषय फक्त राष्ट्रीय नाही, तर जागतिक स्तरावर जाणारे असतात. तसेच अंतर्मुख करतात, विचार करायला लावतात. ‘आता वेळ झाली’ हा सिनेमा आज 23 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.

[email protected]