
मुंबई महापालिकेने वरळी येथील सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा गिरणी कामगार पृती समितीने दिला आहे.
सेंच्युरी मिलचा भूखंड मुंबई महापालिकेने 45 ते 50 वर्षे भाडय़ाने दिला होता. नुकताच त्याचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. तो भूखंड महापालिकेने ताब्यात घेतला आहे. नव्या धोरणानुसार त्या भूखंडाची विक्री करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्य सचिव वल्सा नायर यांच्या दालनात गिरणी कामगार पृती समितीच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी खटाव, सेंच्युरीबरोबरच एनटीसीच्या 14 गिरण्यांत आणि रिपेरिंग बोर्ड, संक्रमण शिबीर किंवा ‘एसआरए’मध्ये एक एफएसआय वाढीव क्षेत्रफळाची जागा देऊन गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध होऊ शकतात, असे सुचविले होते. लॅण्ड सिलिंग अॅक्टमधील ज्या जागा महापालिकेकडे आलेल्या आहेत त्यातील सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावा, अशी मागणीही केली होती. या मागणीवर मुख्य सचिवांच्या बैठकीत त्यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली होती. असे असताना आता सेंच्युरी मिलमधील सहा एकर जागा महापालिका लिलावात काढत असल्यामुळे कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रश्नावर कामगार वर्गात उठाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
























































