कडकी लागलेल्या माजी मॅनेजरनेच घातला ICICI बँकेवर दरोडा , बॅंकेचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी

कडकी लागलेल्या माजी मॅनेजरनेच विरारच्या आयसीआयसीआय बँकेत घुसून ‘दरोडा’ टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याने दोन महिला कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला करीत रोख रक्कम व लॉकरमधील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मनवेलपाडा सबवेजवळ गुरुवारी ही घटना घडली. या हल्ल्यात महिला व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी महिला सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल केले आहे. बेफाम झालेल्या या माजी मॅनेजरचे नाव अनिल दुबे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे.

माजी मॅनेजर अनिल दुबे हा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. पैशाची अडचण सोडवण्यासाठी त्याने विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील आयसीआयसीआय बँकेवर दरोडा घालण्याचा प्लॅन आखला. गुरुवारी संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्रद्धा देवरुखकर (32) आणि व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी (34) या दोघीच होत्या. रात्री 8 च्या सुमारास बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघींनी कडाडून विरोध केला. दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला तर रोखपाल श्रद्धा देवरुखकर गंभीर जखमी झाल्या.

स्थानिकांनी हल्लेखोराला पकडले

हल्ला करून माजी मॅनेजर दुबे हा पळून जात होता. पण त्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वहाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारात जखमी झालेल्या रोखपाल श्रद्धा देवरुखकर यांना संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. ज्या बँकेत दुबे मॅनेजर म्हणून काम करीत होता त्यानेच दरोडा का टाकला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

रस्त्यावरून पळून जाणाऱ्या आरोपी दुबे याला जेसिका आलीम (22) व तिचा मित्र आदिल पठाण या दोघांनी पाठलाग करून पकडले. आरडाओरडा करत लोकांना जमवले. स्थानिकांनी माजी मॅनेजरला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला पकडणारे जेसिका व आदिल या दोघांचा आज पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या