धोनी-कोहली द्वंद्वाने आयपीएलचा शंखनाद

22 मार्चपासून स्पर्धेची रनधुमाळी, फक्त 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक  जाहीर झाले असून महेंद्रसिंग धोनीचा गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने 22 मार्चपासून या बहुचर्चित स्पर्धेचा शंखनाद होणार आहे. चेन्नई संघाच्या एम. ए. चिदंबरम या होमग्राऊंड आयपीएलची सलामी लढत होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सध्या फक्त 22 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान होणाऱया 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या मोसमातील सलामीचा सामना खेळणार आहे.

महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल. त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात या वर्षी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता 17 दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दहा शहरांमध्ये रंगणार 21 सामने

दोन आठवडय़ांच्या कालावधीत 10 शहरांमध्ये आयपीएलचे 21 सामने खेळले जातील. प्रत्येक संघ किमान तीन सामने आणि जास्तीत जास्त पाच सामने खेळणार आहे. पहिल्या आठवडय़ात दोन डबल हेडर सामने होणार असून याची सुरुवात शनिवारी दुपारी दिल्ली पॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज सामन्याने होईल. त्यानंतर संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होईल. यानंतर घरचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना रविवार, 24 मार्च दुपारी जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सशी होईल.