शिमग्याक चला कोकणात; ठाण्यातून एसटीच्या ७५ जादा गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. एसटी महामंडळ ठाणे विभागाने कोकणात जाण्यासाठी ७५ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे तसेच अन्य गाड्यांमधून रेटारेटी करत गाव गाठणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. आमच्या गावान् हाय शिमगा असे म्हणत चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत.

सुरक्षित आणि सुखरूप प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला होळीच्या सणात चाकरमान्यांची पहिली पसंती मिळते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवामध्ये नोकरी व्यवसायानिमित्ताने स्थानिक झालेल्या कोकणवासीयांच्या दिमतीला एसटी महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे. ठाणे विभागातील विविध आगारांतून दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील महाड या मार्गावरून गाड्या धावणार आहेत. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना जाहीर केलेली सवलत मिळणार आहे.

पाच आगारांतून सुटणार बस
बोरिवली आगारातून १७, भाईंदर आगारातून ३, ठाणे-खोपट आगारातून २१, कल्याण आगारातून १७ आणि विठ्ठलवाडी आगारातून २१ बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा ऑनलाइन तसेच ऑफलाइन उपलब्ध असून २८ फेब्रुवारी ते २ मार्चपासून बुकिंग सुरू होणार आहे. ग्रुप बुकिंगची सोय उपलब्ध करण्यात आली असून अद्याप कोणतेही ग्रुप आरक्षण झाले नसल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.