
‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियामणी एका वक्तव्यामुळे चर्चेत आलीय. दाक्षिणात्य कलाकारांना बॉलीवूडमध्ये दिल्या जाणाऱया वागणुकीवर प्रियामणीने आपले स्पष्ट मत मांडले आहे. विशेषतः हिंदी चित्रपटांमध्ये दक्षिणेकडील कलाकारांचे हिंदी उच्चार चुकीचे दाखवून खिल्ली उडवली जात असल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रियामणी एका मुलाखतीत म्हणाली, बॉलीवूड प्रेक्षकांमध्ये आजकाल दाक्षिणात्य कलाकार किंवा चित्रपट लोकप्रिय होत आहेत. त्यांचा अभिनय लोकांना आवडतोय. एकेकाळी अशाच प्रकारे श्रीदेवी, हेमा मालिनी आणि रेखा बॉलीवूडवर राज्य करत होत्या. त्यांच्यानंतर फारसं कोणी बॉलीवूडमध्ये चमकले नाही. बॉलीवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांची अशी प्रतिमा दाखवतात की, त्यांना हिंदी बोलताच येत नाही.
आइयो, कैसा जी, क्या बोलता जी… अशा प्रकारे दाक्षिणात्य कलाकारांना बॉलीवूड चित्रपटात दाखवले जाते. प्रियामणी पुढे म्हणाली, ‘अर्थात आता बऱयाच गोष्टी बदलताना दिसत आहेत. मी बरेच चित्रपट पाहिलेत, पण त्यातल्या कोणत्याच चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांना चुकीच्या पद्धतीने हिंदी बोलताना दाखवलेलं नाही. कदाचित बॉलीवूडवाले अशाच लोकांना भेटले असतील जे चुकीच्या पद्धतीने हिंदी बोलतात. पण आता दाक्षिणात्य कलाकार बॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत आणि यशस्वी होत आहेत.’


























































