धाराशिव येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

सामना ऑनलाईन । धाराशिव

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची धाराशिव शाखा व येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या ७, ८ व ९ सप्टेंबर २०१८ रोजी धाराशिव येथे पार पडणार असल्याची माहिती धाराशिव नाट्य परिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
धाराशिव येथे मे २०१७ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने नाट्यसंमेलनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या नाट्य संमेलनामुळे जिल्ह्यातील नाट्य चळवळीस उर्जा मिळाली असून त्यातून अनेक नवनवीन कलावंत जिल्ह्यात तयार होत आहेत. अशा नवकलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी या उद्देशाने नाट्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसाठी राज्यातील नामांकीत अशा ४० कलावंताना आमंत्रित करण्यात येणार असून उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या पहिल्या विजेत्यास ५१ हजार, द्वितीय विजेत्यास ३१ हजार, तृतीय विजेत्यास २१ हजार, चतुर्थ विजेत्यास ११ हजार रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे उत्तेजनार्थ म्हणून ५ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार असून उत्कृष्ट पुरुष कलाकार, उत्कृष्ट स्त्री कलाकार, उत्कृष्ट संहिता लेखल, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट पार्श्वसंगीत व उत्कृष्ट प्रकाश योजना आदी विभागातही प्रथम, द्वितीय, तृतीय असे अनुक्रमे दीड हजार, एक हजार व पाचशे रुपयाचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा शहरात नगर परिषदेकडे असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात आयोजित करण्यात आली असून यासाठी लागणारी ध्वनी व्यवस्था व इतर आवश्यक गोष्टीची पुर्तता करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी शिंगाडे यांनी दिली.

या राज्य एकांकिका स्पर्धेसाठी येणार्‍या सर्व स्पर्धकांची तीन दिवसाची निवास व भोजनाची व्यवस्था नाट्य परिषदेच्या वतीने मोफत करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

शिक्षणमहर्षी कै. बापुजी साळुंके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच जेष्ठ भजनी गायक गंगाधर शिंगाडे करंडकही विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ही राज्य एकांकिका स्पर्धा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असून ही एकांकिका स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या