नाट्यरंग – नाट्यक्षेत्राला पुन्हा कोरोनाचा फटका!

>> शुभांगी बागडे 

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱया लाटेने शिरकाव केला. वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारने लॉक डाऊन जाहीर केले. लॉक डाऊनमधील कडक निर्बंधांची अंमलबजावणी होताना याचा पहिला फटका मनोरंजन क्षेत्राला आणि मुख्यत्वे नाटय़ क्षेत्राला बसला. वीक एण्ड लॉक डाऊन जाहीर होताच नाटय़गृहे बंद झाली आणि गेल्या अगदी काही दिवसांपूर्वीच पूर्ववत होऊ पाहणारं हे क्षेत्र पुन्हा एकदा ठप्प झालं. मागील वर्षभरापासून बंद असणारी नाटय़गृहं साधारण 2-3 महिन्यांपासून सुरू झाली होती. बुकिंगचे गणित जमण्यासाठी बरेचसे प्रयोग केवळ शनिवार-रविवारच सादर होत होते. मात्र असं असलं तरी काही महिन्यांनी का होईना नाट्य क्षेत्र पूर्वपदावर येईल अशी आशा होती. परंतु मराठी नाटय़सृष्टी लॉक डाऊनमुळे पुन्हा कोलमडली आहे. यामुळे नाटय़ क्षेत्रासंबंधातील अनेक प्रश्न अधांतरी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन नाटय़ क्षेत्राबाबतचे निर्बंध कधी आटोक्यात येतील याकडेच या क्षेत्रातील साऱयांचे लक्ष लागले आहे. नाटय़ क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, रंगमंच कामगार, नाटय़ व्यवस्थापक सारेच या स्थितीबाबत धास्तावले आहेत.

कोरोनाच्या संकटाचा सामना समाजातील प्रत्येक स्तराला करावा लागला आणि लागत आहे. मात्र यातील सर्वाधिक फटका हा मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. वेगवगेळ्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्र आलेल्या स्थितीतून मार्ग काढू पाहत आहे. मात्र नाटक हे प्रत्यक्ष सादर होणारं माध्यम असल्याने इतर कोणत्याही माध्यमातून ते सादर होणं आणि रसिकांनी त्याचा आस्वाद घेणं हे फारसं होताना दिसत नाहीये. यामुळेच लॉक डाऊन संपेल आणि नाटक प्रत्यक्ष नाटय़गृहात सादर होईल याची वाट या क्षेत्रातील प्रत्येक घटक आणि रसिक प्रेक्षक पाहत आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत याच भावना ज्येष्ठ नाटय़लेखक, दिग्दर्शक विजय पेंकरे मांडतात… ‘‘गेले वर्षभर नाटय़सृष्टी पूर्णतः ठप्प होती. लॉक डाऊनची सर्वात जास्त झळ या क्षेत्राला सोसावी लागली. अशा प्रसंगातही नाटय़ क्षेत्रातील प्रत्येक घटकाने एकमेकांची साथ देत यातून तरून जाण्याची जिद्द ठेवली आणि दिवाळीनंतर पुन्हा एकदा हे क्षेत्र रसिकांसाठी उभं राहिलं. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचं पालन करत नाटय़ प्रयोग सुरू झाले. रसिकांची भीती नाहीशी करत त्यांना नाटय़गृहाकडे वळवण्यासाठी नाटय़ क्षेत्रातील सर्वच घटक प्रयत्नशील होते आणि त्याला रसिकांचा प्रतिसादही लाभला. परंतु दुसऱयांदा लॉकडाऊन लागल्यानंतर आता पुन्हा यातून बाहेर पडत नाटय़ क्षेत्राची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी कमालीची ताकद पणाला लागणार आहे. लॉकडाऊननंतर नाटक सुरू झाल्यानंतर कलाकार, दिग्दर्शक यांनी मानधन कमी घेत हे क्षेत्र सुरळीत कसं होईल यालाच प्राधान्य दिलं. यानंतरची पायरी होती ती म्हणजे नवीन नाटय़ प्रयोग होणं. मात्र येत्या काळात नव्याने नाटक बसवण्याबाबत थोडी साशंकता राहील. कलाकरांना नाटय़ क्षेत्राशिवाय इतर पर्याय मिळत असतील तर ते स्वीकारणं व्यवहार्य ठरल्याने नवीन फळी तयार होण्यात अडचणी येतील. शिवाय यात लेखक, दिग्दर्शक यांना काम मिळणं काहीसं दुरापास्त होईल. रंगमंच कामगार, कलाकार, निर्माता, दिग्दर्शक या सगळ्यांसाठी हा अडचणींचा काळ आहे. प्रत्येकाचे स्वतंत्र प्रश्न आहेत. प्रत्येक जण यातून मार्ग काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. या सर्व वेगवेगळ्या घटकांवर झालेल्या या परिणामांमुळे नाटय़ क्षेत्राचं बिघडलेलं गणित सुधारण्यात वेळ जाईलच. यावर मात करण्यासाठी नाटय़ क्षेत्र प्रयत्न करेल यात शंका नाही; परंतु यात मुख्य अडचण असेल ती रसिकांना पुन्हा नाटय़गृहात आणण्याची. प्रत्यक्ष सादर होणारं नाटक पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी रसिक नाटय़गृहात येतोच; पण सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मने सगळ्यांनाच वेड लावले आहे. त्यामुळे तेही एक आव्हान ठरेल. मात्र नाटय़गृहाच्या रंगमंचावर सादर होणारा प्रयोग पाहण्याची मजा इतर कोणत्याच माध्यमात नाही असं मानणारा रसिक वर्ग मराठीसृष्टीत अजून तरी आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण मराठी नाटय़सृष्टी या सर्व अडचणींवर मात करेल आणि पुन्हा उभी राहील हा विश्वास आहेच. यासाठी शासन आणि नाटय़ क्षेत्रातील मंडळी सर्वांनीच एकत्र येत प्रयत्न करणं गरजेचं आहे.’’

नाटकाचा अनुभव घेताना रसिकांच्या दृष्टीस केवळ रंगमंचावरील कलाकार असतात; परंतु हे नाटक उभं राहण्यासाठी, सादर होण्यासाठी अनेक कलावंत आणि कामगार रंगमंचाच्या मागे धडपडत असतात. रंगमंच कामगार, बुकिंग क्लार्क, व्यवस्थापक असे हे सारे पडद्यामागील मंडळी जबाबदारी पार पाडत असतात. राज्यात 14 एप्रिलपासून लॉक डाऊन लागले आणि पुन्हा एकदा नाटय़ व्यवसायाला खीळ बसली. याबाबत शिवाजी मंदिरचे बुकिंग व्यवस्थापक हरी पाटणकर सांगतात, ‘‘राज्यात लॉक डाऊन लागल्यानंतर नाटय़गृहं बंद झाली. त्यामुळे केवळ नाटकांवरच उपजीविका असणाऱया पडद्यामागील कलावंतांपुढे पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुरुवातीला केवळ 15 दिवस जाहीर केलेला कालावधी पुन्हा वाढवला. यामुळे मदतीचा ओघही फारसा दिसून येत नाही. अर्थात प्रत्येकालाच या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत पुढाकार घेत आम्हा पडद्यामागील कलावंतांच्या समस्या जाणून घेत आर्थिक पॅकेज जाहीर करावे. नाटय़गृह पुन्हा कधी सुरू याबाबत पूर्णतः अस्पष्टता आहे. केवळ नाटय़ व्यवसायावरच आमची उपजीविका असल्याने आम्ही हतबल झालो आहोत. तेव्हा शासनाने यातून मार्ग काढावा.’’

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर रसिकांना नाटय़गृहाकडे वळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले गेले. नाटय़ प्रयोग उत्साहाने सादर होऊ लागले. रसिकांनीही नाटय़ क्षेत्रातील या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद दिला. यात रसिकांच्या आरोग्याचीही जबाबदारीही योग्यरीत्या पार पडली जात होती. नाटय़ क्षेत्र पूर्वपदावर यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱयांमध्ये निर्माता, कलाकार प्रशांत दामले यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. या प्रयत्नांत कुठेही कसर न ठेवणारे प्रशांत दामले यांनी या परिस्थितीवर मात करण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, ‘‘गेल्या वर्षी मार्चअखेरीस बंद झालेली नाटय़गृहं तब्बल नऊ महिन्यांनी उघडली आणि नाटय़ व्यवसायात उत्साहाचे वातावरण तयार झाले. रसिकांच्या आरोग्याची काळजी घेत, शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नाटय़ प्रयोग होऊ लागले. रसिकांचा चांगला प्रतिसादही लाभू लागला. नाटय़ व्यवसाय पूर्वपदावर येईल असं सकारात्मक चित्र दिसत असतानाच दुसऱया लाटेचा कहर झाला आणि नाटय़ व्यवसाय पुन्हा एकदा कोलमडला. मागील लॉक डाऊनच्या काळातून सावरताना या क्षेत्रातील सर्वांनीच नाटय़ व्यवसाय उभा राहावा म्हणून सर्वस्व पणाला लावले. आताही यातून सावरण्यासाठी आपणच प्रयत्न करणं गरजेचं आहे. या काळात सकारात्मक राहणं, खंबीर राहणं आणि त्याच्या आधारे परिस्थितीवर मात करणं एवढंच आपल्या हाती आहे. तरच आपण यातून बाहेर पडू. मराठी नाटय़सृष्टीसमोर अशा अडचणी आल्या आहेत. याही संकटावर ती निश्चितपणे मात करेल हा विश्वास आहे. मात्र शासनाकडून अपेक्षा करायची झाली तर दुसऱया व तिसऱया फळीतील नाटय़ कलावंत व कामगारांसाठी अग्रक्रमाने मदत जाहीर झाली पाहिजे. यासोबत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन आणि सुजाण नागरिक म्हणून अंगिकारलेली शिस्त यांच्या मदतीने आपण यातून नक्की बाहेर पडू.’’

येणार काळ अवघड असला तरी अशक्य नक्कीच नाही हे मराठी नाटय़सृष्टीने एकदा सिद्ध केले आहेच. मराठी नाटय़सृष्टी आणि आपण सगळेच कोरोनाच्या या संकटातून नकीच बाहेर पडू आणि हाही काळ याच आशावादाने पार पाडू!

नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाटय़सृष्टी कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर पुन्हा कोलमडली आहे. नाटय़क्षेत्राला गती येत असताना असे संकट आल्याने नाटय़क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, रंगमंच कामगार, नाटय़ व्यवस्थापक सारेच धास्तावले आहेत. रंगमंचावर नाटकाचा प्रयोग सादर व्हावा याकरता अनेक हात राबत असतात. अशा पडद्यामागील कलावंतांवरही चरितार्थाचा प्रश्न उभा आहे. मात्र याबरोबरच यातूनही मार्ग काढू आणि आलेल्या परिस्थितीवर मात करू हा आशावादही प्रबळ आहे.

कामगारांसाठी आर्थिक मदत प्राप्त होणं गरजेचं

कोरोनाची दुसरी लाट आली आणि काहीसा पूर्वपदावर येत असलेला नाटय़ व्यवसाय पुन्हा बंद झाला. नाटय़ क्षेत्रातील प्रत्येक सदस्याला याची झळ बसत आहेच; परंतु रोजच्या नाटय़ प्रयोगावरच ज्यांचे मानधन अवलंबून असते अशा रंगमंच कामगाराला याचा सर्वाधिक फटका बसतोय. मुळात गेले वर्षभर नाटय़ क्षेत्र ठप्प होतं. त्यामुळे जी काही जमापुंजी होती ती त्या काळातच संपली. या काळात अनेकांनी उत्पनासाठी वेगळे मार्गही स्वीकारले. मात्र लॉक डाऊननंतर सर्व काही सुरळीत होईल या आशेने पुन्हा या क्षेत्राकडे सरसावले. पहिल्या लॉक डाऊननंतर नाटय़ प्रयोग सुरू झाले तरी प्रयोगांच्या संख्येने वेग पकडला नव्हता. त्यामुळे मासिक उत्पन्नाचा आकडाही अत्यल्पच होता. यात पुन्हा एकदा सारं काही थांबलं. मागच्या लॉक डाऊनच्या काळात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कलाकार ऑफ महाराष्ट्र या संस्था रंगमंच कामगारांच्या मदतीसाठी पुढे आल्या होत्या. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडून भरघोस मदत प्राप्त झाली. रंगमंच कामगार संघातर्फे कामगारांना अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत केली जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निधी उभा करून लॉक डाऊनच्या काळात कामगारांना तात्पुरती आर्थिक मदत केली होती. परंतु या वेळी संघालाही निधी उभा करणे शक्य झाले नाही. शिवाय सांस्कृतिक मंत्रालयाकडून जाहीर झालेली मदतही अद्याप प्राप्त झाली नाही. त्यामुळे ठोस उपाय राबवणे, रंगमंच कामगारांसाठी मदत उभी करणे हे रंगमंच कामगार संघासाठी आव्हानच ठरत आहे. मागच्या काळात कामगारांना उत्स्फूर्ततेने मदत प्राप्त झाली, मात्र सध्या सगळीकडे सारखीच स्थिती आहे. त्यामुळे मदत कुठे व कशी मागावी आणि त्याला प्रतिसाद लाभेल का, या प्रश्नांच्या गर्तेतच रंगमंच कामगार आणि कामगार संघ अडकला आहे. – सदानंद कोरगावकर, सचिव, रंगमंच कामगार संघ

– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या