चापोलीत गाडीच्या अपघातामुळे सापडले चोर

304

चाकूर येथील एटीएममधून विठ्ठल सूर्यवंशी यांनी पैसे काढल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे पैसे आणि एटीएम कार्ड हिसकावत गाडीने पळ काढला. आनंदवाडी शिवारात त्या गाडीचा अपघात झाल्यामुळे दोन चोरांना पकडण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप एक चोर फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

चाकूर येथील विठ्ठल सूर्यवंशी शुक्रवारी एटीएममधून पैसे काढत असताना चोरांनी त्यांच्यावर पाळख ठेवली होती. पैसे काढून बाहेर येताच त्यांच्या हातातील एटीएम व पाचशे रुपये हिसकावत चोरट्यांनी कारने चापोलीकडे पोबारा केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. चापोली येथील पोलीस पाटील सिराज देशमुख यांना पोलिसांनी फोन करून नाकाबंदी करण्यासाठी सांगितले. मात्र, चोरट्यांनी शंभरच्या वेगाने गाडी आनंदवाडीकडे वळवली. सिराज देशमुख व काही तरुणांनी त्या गाडीचा पाठलाग केला. आनंदवाडी शिवारात वळण रस्त्यावर त्या चोरट्यांच्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी शेतात जाऊन पडली. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडीचा चुराडा झाला. गाडीतील तिघेही यात किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यावर ते तिघेही गाडीतून उतरून पळून गेले. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहचत त्यांचा शोध सुरू केला. यात राजेश बलूराम उर्फ इलूराम सिंग (रा. हसी जि. इसार हरियाणा), योगिंदर चंदरसिंग पट्टी (शैमान ता.नारनुद जि.इसार) या दोन चोरट्यांचा पाठलाग करून पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र तिसरा अजूनही फरार आहे. यात सिराज देशमुख व ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या