शिरूर तालुक्यातील शिंदे मळा येथील श्री दत्त मंदिरात चोरी; 11 हजाराचा मुद्देमाल लांबवला

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विविध ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरु असतानाच चोरट्यांनी मलठणच्या लाखेवाडी नजीक शिंदे मळ्यात असलेल्या श्री दत्त मंदिराची दोन ग्रिलची कुलपे तोडून मंदिरातील सुमारे 10 हजार रुपये किमतीचा ऍम्प्लिफायर व एक पितळाची समई असा एकूण 11 हजाराचा मुद्देमालाची चोरी केली आहे. या चोरीच्या घटनेबाबत मंदिराचे पुजारी एकनाथ निवृत्ती शिंदे (रा.शिंदेमळा, मलठण) यांनी टाकळी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिल्याची माहिती पोलीस नाईक निलेश शिंदे यांनी दिली.

मलठण लाखेवाडी दरम्यान असलेल्या शिंदे मळ्यात लोकवर्गणीतून सुंदर असे श्री दत्त मंदिर बांधण्यात आले आहे. शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी मंदिराचे मुख्य व गाभाऱ्यास असलेल्या ग्रिलची कुलपे तोडून मंदिरातील ऍम्प्लिफायर व एक पितळेची समई असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. परिसरात एक दोनच घरे आहेत. याच संधीचा चोरटयांनी गैरफायदा घेत चोरी केल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती स्थानिकांनी शिरूर पोलिसांना देताच टाकळी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी मलठणचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा गायकवाड, विलासराव गोसावी, मोहन शिंदे, पांडुरंग शिंदे,संतोष कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे, कोणी संशयास्पद व्यक्ती वाटल्यास शिरूर पोलिसांना कळविण्याचे आवाहन शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले आहे.