भाडेकरूनेच फोडले मालकाचे घर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरामध्ये सातत्याने घरफोड्या होत आहे. पाच दिवसांपूर्वी नगर शहरामध्ये एक बंद घर फोडून चोरट्यांनी दागिने चोरून नेले होते. पोलीस तपासानंतर भाडेकरूनेच घरमालकाच्या घरी चोरी केल्याचे उघडकीस आले. कोतवाली पोलिसांनी या भाडेकरूला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले 18 तोळे सोने, पाच तोळे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

रवींद्र शंकर ताडीकोंडा असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता बुधवार (2 जानेवारी)पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. ताडीकोंडा याने गौरीघुमट परिसरातील आनंदीबाजार येथे व्यंकटेश रामैय्या बुरा यांची रुम भाडेतत्वावर घेतली होती. बुरा हे कुटुंबासह हैदराबाद येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्या दरम्यान चोरट्याने त्यांचे घरफोडून सोने, चांदीचे दागिने चोरून नेले होते. बुरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. भाडेकरू ताडीकोंडा हा निघून गेला असल्याचे बुरा यांनी कोतवाली पोलिसांना सांगितले. त्यानुसार कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे व इतर पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. ताडीकोंडा याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा शोध घेतल्यानंतर ताडीकोंडा याला जुन्या चोरीच्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी अटक केल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून, तो अट्टल गुन्हेगार आहे. आरोपी हा राहुरी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरून नेलेले 18 तोळे सोने, पाच चांदीचे दागिने असे 4 लाख 52 हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.