
धायरी परिसरातील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 36 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संदीप झराड (वय 26, रा. ज्ञानेश्वरी पार्क, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संदीप यांचा धायरीतील गारमळा भागात एका सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातून 36 हजार रूपये किंमतीची चांदीची बिस्कीटे चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी श्री अपार्टमेंटमध्ये विनोद काटकर (वय 42) यांचा पहिल्या मजल्यावरील फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांना या फ्लॅटमध्ये काहीच हाती लागले नाही. रविवारी सकाळी दोन्ही फ्लॅटचे दरवाजा उघडे दिसल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
महिलेची 49 हजारांची सोनसाखळी हिसकाविली
रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील 49 हजार रूपये किंमतीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कृष्णाई मंगल कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी 40 वर्षांच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित महिला लहान मुलीसोबत रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 49 हजारांची सोन्याची साखळी हिसका मारून चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ अधिक तपास करीत आहेत.





























































