
साईबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या 75 वर्षांच्या वृध्दाजवळील सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी पळवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत रणछोडदास भगवानदास भंडारी (रा.उषाकिरण टॉकीजजवळ, लातूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. ते गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिरात दर्शनासाठी रस्त्याने जात होते. मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात थांबवले. बाहेर कोरोना आहे, कशाला फिरत आहात. अंगावरील दागिने जपून ठेवा, असे सांगीतले. त्यांच्या गळ्यातील 2 तोळयाचे लॉकेट आणि हातामधील एक तोळ्याची सोन्याची अंगठी हातचालाखीने पळवली. फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात दोघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी देशमुख करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागिने पळवले
आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करुन 64 वर्षांच्या व्यक्तीच्या जवळील 2 तोळ्याची सोन्याची चैन आणि 1 तोळयाची सोन्याची अंगठी दोघा भामट्यांनी पळवली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशव मुकुंदराव देशमुख (रा. दत्तनगर, लातूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आर.जे कॉप्लेक्स जवळ मोटारसायकलवर आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत. रात्री गांजाचा छापा पडला आहे. त्याच्या तपासासाठी आम्ही आलो आहोत असे सांगितले. तक्रारदारांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन आणि हातातील 1 तोळयाची सोन्याची अंगठी काढून हातरुमालमध्ये बांधून ठेवण्यासाठी सांगितले. हातचालाखीने सोन्याचे दागिने पळवले. इतर एका व्यक्तीचीही त्यांनी अशीच तपासणी केली. शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरात आणि जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
























































