नगरच्या स्टेशन रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्री 6 ठिकाणी घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहर व उपनगरात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरी, घरफोडी, दरोडे, जबरी चोरी, वाहन चोरी, मंगळसूत्र चोरी, रस्तालूट यासारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याचे सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कायदा व पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चोरटे आता दिवसाढवळ्याही घरफोड्या करीत आहेत. स्टेशनरोडवरील आनंदनगर येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून सहा ठिकाणी चोरी व चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

स्टेशन रोड परिसरातील लोखंडी पुलाजवळ असलेल्या आनंदनगर येथे चोरट्यांनी एकाच रात्री सहा वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केली. आनंदनगर येथील कलागते दूध डेअरीच्या पाठीमागे राहत असलेल्या नितीन चंपालाल गादीया यांच्या गादीया किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर आणि कुलूप तोडून चोरट्यांनी आत शिरले. दुकानातील सिगारेट, तंबाखू असे सुमारे 2 ते 3 हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले. यावेळी झालेल्या आवाजाने घरातील लोकांना जाग आली. त्यांनी उठून खिडकीतून पाहिले असता त्यांना चोरटे दिसले. नागरिकांना जाग आल्याचे पाहताच चोरटे तेथून पसार झाले. यानंतर चोरट्यांनी शेजारीच राहत असलेले प्रा. प्रफुल्ल राजेंद्र साळवे यांच्या बंद घराच्या दरवाजा व सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील बेडरुम व कपाटातील सामानाची उचका-पाचक करुन सामान अस्ताव्यस्त फेकले. प्रोफेसर साळवे हे कुटुंबासह लग्नकार्यानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या घरात चोरी केली. परंतु त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज गेला? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. त्यानंतर चोरट्यांनी प्रविण कांतीलाल मुनोत यांच्या बंद घराकडे मोर्चा वळविला. सेफ्टीडोअरचे लॉक व दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उचका-पाचक करुन सामान अस्ताव्यस्त फेकले. मुनोत हे पुण्याला वास्तव्यास असल्याने त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर भाडेकरी राहतात. चोरट्यांनी किचनमध्ये फ्रिज उघडून आतील खाद्य पदार्थांवर ताव मारला. तेथे त्यांना काहीही न मिळाल्याने त्यांनी घरातील कपडे घेऊन पोबारा केला.चोरट्यांनी आनंदनगर येथील शिक्षक घुले यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडले व शेजारील घराला कडी लावली. परंतु चोरट्यांना येथे काही न मिळाल्याने चोरटे हात हलवित निघून गेले. यानंतर चोरट्यांनी बाळासाहेब गाडीलकर यांच्या विटभट्टीकडे मोर्चा वळविला. विटभट्टीवरील कामगार राहत असलेल्या खोल्यामधील ज्ञानेश्वर सुदाम माळी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली व आतील सुमारे अडीच ते तीन हजार रुपये चोरुन नेले. तसेच शेजारी राहत असलेल्या अर्जुन दशरथ दळे यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत उचका-पाचक केली. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. या सहाही घटनांमध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही.

आनंदनगरमध्ये झालेल्या चोऱ्यांच्या घटनेबाबत नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्याला माहिती दिली. चोरीच्या घटनांची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरी झालेल्या ठिकाणी कसून चौकशी करुन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट ब्युरो व श्वान पथकास पाचारण केले. मात्र, अद्याप चोरट्यांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.