दारूसाठी काहीही… चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरटे कोणत्या वस्तूंची कधी चोरी करतील, याचा काही नेम नाही. त्यात व्यसनाधिनता असल्यास मग कोणत्याही थराला जाण्याची चोरट्यांची तयारी असते. असाच एक प्रकार चंदननगरमधील देशी दारूच्या दुकानात घडला आहे. चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून 63 हजारांचे तब्बल 32 बॉक्स चोरून नेले आहेत. ही घटना रविवारी मोझे देशी दारूच्या दुकानात घडली. याप्रकरणी बाळासाहेब पुरी (वय 30, रा. चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगरमधील साईनगरी रस्त्यावर बाळासाहेब यांचे देशी दारू विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील 63 हजार रूपये किंमतीचे देशी दारूचे 32 बॉक्स चोरून नेले. बाळासाहेब दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दारूची चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव तपास करीत आहेत.