मेरा नंबर डायल करो, असे म्हणत मजूराचा हिसकाविला मोबाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात मोबाईल चोरट्यांनी धुडगूस घातला असून पत्ता विचारण्यासह विविध शक्कल लढवून पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकाविले जात आहेत. कोथरूड परिसरात दुचाकीस्वार चोरट्याने मेरा नंबर डायल करो, असे म्हणत कामगाराचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. पवन लुगून (वय 24, रा. बावधन खुर्द लेबर कॅम्प ) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पवन हा बांधकाम मजूर असून रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एमएनजीएल गॅस स्टेशनजवळ थांबला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्याला ‘लेबर का काम करते हो. मेरे पास काम है. आप मेरा नंबर डायल कर लो’, असे म्हणत गप्पा मारण्यात गुंतविले. पवनने खिशातला मोबाईल नंबर सेव्ह करण्यासाठी बाहेर काढताच चोरट्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावत पोबरा केला.