फुटपाथवर राहून दुकाने फोडणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

फुटपाथवर राहायचे आणि रात्रीच्या अंधारात बंद दुकानांमध्ये चोरी करायची. कटावणीने शटर उघडल्यानंतर जे हाताला लागेल ते घेऊन पसार व्हायचे आणि मौजमजा करायची. अशा प्रकारे 23हून अधिक घरफोडय़ा करणाऱया एका सराईत चोराच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने मुसक्या आवळल्या आहेत.

एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 जूनच्या रात्री एक बंद दुकान फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सहा लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील माने तसेच दत्ता कुडले, सुनील कांगणे, आनंदा गेंगे, किरण जगदाळे आणि अशोक सावंत या पथकाने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. दुकान तसेच दुकानाबाहेर सीसीटीव्ही नसल्याने आरोपी कोण याचा थांगपत्ता लागत नव्हता.

सुनील माने यांनी खबऱ्यांचे जाळे पसरवले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा चोरी करणारा नागपाडय़ाच्या फारस रोडवरील फुटपाथवर झोपणारा मोहम्मद जाफर करीम शेख ऊर्फ चुआ (55) हा असल्याचे समोर आले. आरोपी चुआ असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा चुआ हा कामाठीपुरा परिसरात सापडला. त्याला पकडून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी एल.टी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

केवळ दक्षिण मुंबईतील दुकाने टार्गेट
फुटपाथवर झोपणाऱ्या चुआला वेगवेगळे शौक आहेत. ते शौक पूर्ण करण्यासाठी तो चोऱ्या करतो. पण केवळ दक्षिण मुंबईत बंद घरांनाच टार्गेट करतो. त्याने आतापर्यंत डी.बी. मार्ग, एल.टी. मार्ग, भायखळा, डोंगरी, पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. दिवसभर तो दुकानांची रेकी करतो. ज्या दुकानात चोरी करायची आहे त्या दुकानाच्या बाहेर रात्री झोपतो. मग मध्यरात्री संधी साधून कटावणीने शटर उचकटतो आणि आत घुसून हात सफाई करतो.