
सामना ऑनलाईन, मुंबई
रमजान काळात मोहम्मद अली रोड परिसरात होणाऱया गर्दीला चोरटय़ांनी टार्गेट केले आहे. सायंकाळी खाऊ गल्लीत होणाऱया गर्दीत नागरिकांचे मोबाईल चोरले जात असून कुटुंबासोबत फिरण्यासाठी बाहेर जाणाऱयांचे घर साफ केले आहेत. पायधुनी पोलिसांकडे अशा अनेक तक्रारी दररोज येत असून पोलिसांनी नुकतेच तिघा चोरांना अटक केली आहे.
बोरिवली येथे राहणारे अजित कुमार मेनन (६२) हे मिनारा मशीद येथील खाऊ गल्लीत खात असताना त्यांचा २५ हजार किमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच नागदेवी स्ट्रीट येथे राहणारे अली अकबर मिठाईवाला (५८) हे कुटुंबासोबत घराला कडी लावून खाऊ गल्लीत गेले होते. त्यांनी पैसे आणण्यासाठी नोकरला पुन्हा घरी पाठवले. नोकर घरी गेला असता आतमध्ये अज्ञात इमस शोधाशोध करता दिसला. ही बाब नोकराने सांगितल्यावर मिठाईवाला यांनी लगेच पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यूपीच्या फैजाबादचा रहिवासी असलेल्या नदीम सागिर खान (२२) या चोराला रंगेहाथ पकडले. दरम्यान, अज्ञात इसमांपासून सावध रहा असा इशारा पायधुनी पोलिसांकडून देण्यात येत आहे.
बसमध्ये चढतानाही हातसफाई
त्या परिसरात सायंकाळच्या वेळेस धावणाऱया बेस्ट बसेसनादेखील प्रचंड गर्दी असते. अहमद मुस्लिम खान (२१) हा तरुण बेस्टच्या १२४ क्रमांकाच्या डबलडेकर बसमध्ये चढला. बसमध्ये चढताच त्याने खिसा तपासला असता मोबाईल व पर्स गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो लगेच खाली उरतला आणि आरडाओरड करून पळून जाणाऱया आरिफ अफझल खान (३०) आणि परवेझ इस्माईल सुरावाला ऊर्फ काल्या (३२) या दोघांना रंगेहाथ पकडले.

























































