गरीब शेतकऱ्याच्या सोयाबीनवर चोरट्यांच्या डल्ला; पोलिसांनी आरोपींना अवघ्या 24 तासात ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

सध्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले आहेत. असे असताना पुढील काही दिवसात सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकरी आपल्या सोयाबीन पिकाची साठवणूक करत आहेत. याचा गैरफायदा काही चोरटे घेत आहेत. वणी तालुक्यातील वंजारी येथील शेतकरी विलास दत्तुजी देउळकर यांनी आपले सोयाबीन शेतातील टिनाच्या शेडमध्ये साठवून ठेवले होते. मात्र, एका रात्रीत चोरट्यांनी 15 क्विंटल सोयाबीनवर डल्ला मारला. ही बाब लक्षात येताच त्यांनी वणी पोलीस ठाण्यात सोयाबीन चोरीची तक्रार दिली.

शेतमाल चोरीचे प्रकरण गांभीर्याने घेत यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला चोरीचा त्वरित तपास करून गुन्हगारांना अटक करण्याची सूचना दिली. अधिक तपासानंतर विलास देउळकर यांचाच सालगड्याचा या चोरीत हात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी सालगडी अनिल नामदेव चव्हाण यांच्यासह तीनजणांना अटक केली. त्यात रोशन तुळशीराम देउळकर , जयेश शंकर देउळकर , अतुल उर्फ विवेक अवधुत धवस यांचा समावेश आहे. हे सोयाबीन त्यांनी व्यापाऱ्यांना विकल्याचे सांगितले. सोयाबीन नेण्यासाठी त्यांनी मोटारसायकलचा वापर केल्याचेही कबूल केले.पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून हे सोयाबीन जप्त केले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहे. आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, चापोहवा नरेश राउत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.