
सामना ऑनलाईन, कोल्हापूर
दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. गेल्या काही दिवसात कोल्हापुरात चोऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून, शनिवारी आंदळकरांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुस्तीची मोठी परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात शहरात दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या घरी चोरी होणं ही कोल्हापूर पोलिसांसाठी प्रचंड नामुष्कीची गोष्ट आहे.
आंदळकर यांचे न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती कॉलनी येथे घर आहे. या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचे संपूर्ण कुटूंब सध्या पुण्यात राहतं, हे कुटुंबीय अधूनमधून कोल्हापूरात येत असतात. घर बंद असल्याने चोरट्यांना त्यात शिरणं आणि बहुमूल्य वस्तू पळवून नेणं सहज शक्य झालं. सकाळी घरकामासाठी आलेल्या महिलेमुळे घरात चोरी झाल्याचं उघडकीस आलं. या महिलेने आंदळकर यांचे नातेवाईक उमेश पोवार यांना चोरी झाल्याची माहिती दिली. पोवार यांनी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिसांत दाखल केली आहे.






























































