‘आयसीएमआर’चा दिलासादायक अहवाल, कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी भयानक नसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप कमी झालेली नसतानाच तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यात कोरोनाचा नवा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे देशात काही रुग्णही आढळले असून आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत. यातील एक मृत्यू महाराष्ट्रातील आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ‘आयसीएमआर’ने एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)’ने कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसऱ्या लाटेसारखी भयानक नसेल असा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये आणखी तेजी आणल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर अंकुश लावता येऊ शकतो, असे आयसीएमआरने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे. ‘आयसीएमआर’चे डॉ. संदीप मंडल, डायरेक्टर जनरल बलराम भार्गव, चिफ एपिडेमोलॉजिस्ट डॉ. समीरन पांडा आणि निमालन अरिनमिनपथी यांनी एका गणितीय मॉडेलच्या आधारावर हा अहवाल सादर केला आहे.

कोविडमुक्तांना पुन्हा धोका

अहवालानुसार, कोरोनाची लागण होऊन जे लोक कोरोनामुक्त झाले आहेत त्यांच्यातील रोग प्रतिकारक क्षमता वेळेनुसार कमी होऊ शकते. त्यामुळे ज्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती तेच लोक पुन्हा एकदा कोरोना सक्रमित होऊ शकतात.

मृतांचा आणि संक्रमितांचा आकडा वाढला

दरम्यान, हिंदुस्थानमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत गर्भवती महिला मोठ्या प्रमाणात संक्रमित झाल्या होत्या. तसेच दुसऱ्या लाटेत मृतांचा आणि संक्रमितांचा आकडाही आधीच्या लाटेपेक्षा वाढला होता, असेही आयसीएमआरने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले.

डेल्टा प्लसचा धोका वाढतोय! संपूर्ण राज्यच तिसऱया स्तरात

एप्रिल-मे मध्ये निर्माण झाली भयानक स्थिती

कोरोनाची दुसरी लाट एप्रिल-मे 2021 मध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. या काळात दररोज विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तसेच मृतांची संख्याही प्रचंड होती. रुग्णसंख्या वाढल्याने देशात ऑक्सिजन आणि बेडचे संकटही निर्माण झाले होते. परंतु आता ही लाट ओसरत चालली असून रोजची रुग्णसंख्या 50 हजारांच्याही खाली आली आहे. या दरम्यान, तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सरकारने तयारीही सुरु केली असून लसीकरणामध्ये तेजी येत आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त लोकांची लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

कोरोना चाचणी कीट फक्त 50 रुपये,आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी केली निर्मिती