कॅरम चॅलेंजर्सचा थरार मुंबईत

कॅरमप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन 29 व 30 जानेवारी 2026 रोजी मुंबईत करण्यात आले आहे. दादर (पूर्व) येथील श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओसमोरील भव्य सभागृहात ही स्पर्धा रंगणार आहे.

पुरुष व महिला खेळाडूंसाठी खुल्या गटात होणाऱया या स्पर्धेत तब्बल 8 लाख रुपयांची आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्यास 1 लाख 50 हजार, उपविजेत्यास 1 लाख, तृतीय क्रमांकास 75 हजार तर चौथ्या क्रमांकास 50 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय उपउपांत्य फेरीतील खेळाडूंना प्रत्येकी 25 हजार, उपउपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना 10 हजार, तर आधीच्या फेरीत पराभूत होणाऱया खेळाडूंना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे ईनाम देण्यात येणार आहे. स्पर्धेतील आणखी एक आकर्षण म्हणजे व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूंना पहिल्या फेरीपासून 1 हजार रुपये, तर उपउपांत्य फेरीपासून 2 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. महिला खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केल्यास 1 हजार, तिसऱया फेरीसाठी 2 हजार, चौथ्या फेरीसाठी 4 हजार, पाचव्या फेरीसाठी 8 हजार, तर सहाव्या फेरीत प्रवेश करणारीस 15 हजार रुपयांचे अतिरिक्त इनाम दिले जाणार आहे.