गोष्ट तिसऱ्या लग्नाची आणि पहिल्या दोन पत्नींकडून तुफान धुलाईची, वाचा सविस्तर…

तमिळनाडूतील तिरुपूर येथे एका व्यक्तीला तिसरे लग्न करण्याचा विचार चांगलाच भोवला आहे. तिसरे लग्न करण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला पहिल्या दोन पत्नींनी तुफान धुतला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

टाइम्स ऑफ इंडिया‘ने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुपुर येथील 26 वर्षीय एस दिनेश रासिपलायम हा एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. दिनेशशी दोन लग्न झालेली आहे. यातील पहिले लग्न 2016 साली प्रियदर्शनी हिच्यासोबत झाले. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपी दिनेश पत्नी प्रियदर्शनीला छोट्या-छोट्या गोष्टींवरून शिवीगाळ करू लागला आणि मारहाणही करू लागला. घरगुती हिंसाचार असह्य झाल्याने अखेर प्रियदर्शनीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती माहेरी येऊन राहू लागली.

पत्नी प्रियदर्शनी सोडून गेल्याने एकटा राहात असणाऱ्या दिनेशने याच वर्षी एप्रिल महिन्यात अनुप्रिया या घटस्फोटीत महिलेसोबत लग्न केले. अनुप्रियाशी लग्नानंतरही दिनेशच्या जुन्या सवयी गेल्या नव्हत्या. तो प्रियदर्शनीसारखाच तिचा छळ करू लागला. मारहाण, शिवीगाळ रोजचे झाले होते. तसेच हुंड्यासाठीही तिचा छळ सुरू होता. नवऱ्याच्या अशा वागणुकीमुळे अनुप्रियाही त्याला सोडून माहेरी निघून गेली.

दोन लग्न झालेले असतानाही दिनेशने गेल्या आठवड्यामध्ये तिसरे लग्न करण्याची तयारी सुरू केली. याची कुणकुण लागलेल्या पहिल्या दोन पत्नींनी दिनेश काम करत असणाऱ्या कंपनीबाहेर ठिय्या मांडला. दिनेश गेटमधून बाहेर येताच दोन्ही पत्नींनी दिनेशची तुफान धुलाई केली. या प्रकरणी महिलांनी पोलिसांमध्येही धाव घेतली आहे. दोघींनीही सुलूर पोलीस स्थानकात दिनेशविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या