शेतकरी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ नये, हाच सरकारचा प्रयत्न!नितीन बानुगडे-पाटील यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सध्या देशातील परिस्थिती पाहिली, तर हे सरकार गुलाम तयार करते की काय? अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे हे राज्य कोणासाठी?’ असा प्रश्न पडतो आहे. शेतकरीवर्गास पैसे मिळू नयेत, आर्थिकदृष्टय़ा ते सक्षम होऊ नयेत, असा प्रयत्न सरकार करीत आहे,’ असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि सांगली, कोल्हापूर जिह्यांचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केला.

‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाला सांगली जिह्यात नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मिरज तालुक्यातील मालगाव आणि शिराळा येथे या कार्यक्रमाचा समारोप सभेने झाला.

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘शासनाने जाहिरातीवर वारेमाप पैसा खर्च करण्यापेक्षा औषध, शेतकरी यांच्यासाठी खर्च करावा. खासगीकरणामुळे ज्ञानमंदिरे आता मद्यविक्रेत्यांच्या हाती गेल्याने मुलांनी तेथे काय शिकावे? मुंबई केंद्रशासित करून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याची खेळी सुरू आहे. शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. सर्वसामान्य माणूस वेळीच जागा झाला नाही, तर संविधान धोक्यात येईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते, संतोष हिरुगडे, पोपट भानुसे, स्वप्नील निकम, योजना पाटील, अशोक साळवी, संजय काटे, पराग पाटील, मधुकर पाटील, सिद्धार्थ जाधव, विनोद आढाव आदी उपस्थित होते.