चप्पल शिवणाऱ्या चांभाराचा रशियन इंफ्लुएन्सरसोबत इंग्रजीत संवाद; फाडफाड इंग्रजी ऐकून चाट पडाल

रस्त्यावरून चालताना आपल्याला फुटपाथवर अनेकदा चप्पलाची दुकान दिसतात. या दुकानाला ‘चप्पलांचा दवाखाना’ही म्हटले जाते. या दुकानात चप्पल, बुट शिवणाऱ्या चांभाराची प्रतिमा आपल्या मनात कायमच कमी शिकलेली अशीच असते. पण आता काळ बदलला असून चांगली शिकलेली लोकंही वडिलोपार्जित कला म्हणून याकडे वळलेली दिसतात. याचाच प्रत्यय मुंबईत रशियन इंफ्लुएन्सरसोबत इंग्रजीत संवाद साधणाऱ्या चांभाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मारिया चुगुरोवा ही रशियन इंफ्लुएन्सर सध्या हिंदुस्थानमध्ये आहेत. हिंदुस्थानातील अनुभव, खरेदी याचे व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत आहे. नुकताच तिने मुंबईत चप्पल शिवणाऱ्या एका चांभाराचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दोघेही एकमेकांशी इंग्रजीत संवाद साधताना दिसताहेत.

विकास असे या चांभाराचे नाव असून त्यांचा व्हिडीओ मारियाने आपल्या @mariechug या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मारिया चुगुरोवा चांभाराचे नाव विचारताना दिसते. तो आपले नाव विकास असे सांगतो. त्यानंतर विकास मारियाला तुम्ही कोणत्या देशातून आला आहात असे विचारतो. त्यानंतर मारिया तुम्ही किती वर्षापासून येथे काम करता? तुमच्या व्यवसायात तुम्ही आनंदी आहात का? असे प्रश्न विचारते.

मारिया पुढे सांगते की आमच्या देशात चप्पल तुटली तर तशीच घालून चालावे लागते. कारण तिथे रस्त्याच्या कडेला चप्पल शिवणारी दुकानं नाहीत. त्यानंतर मारिया विकास यांना किती पैसे झाले विचारते? या सर्व प्रश्नांनी उत्तरं विकास हे इंग्रजीमध्ये देतात. त्यांची फाडफाड इंग्रजी ऐकून मारियाही अवाक होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mariia Chugurova (@mariechug)

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत 4.7 मिलियन लोकांनी लाईक केला आहे, तर 72 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तसेच चप्पल शिवण्याचे फक्त 10 रुपयेच घेतले म्हणून त्यांचे कौतुकही करत आहेत. कारण बऱ्याचदा विदेशी पर्यटक पाहून जास्त पैसेही घेतले जातात. पण मुंबईकर विकास यांनी तसे केले नाही.