यंदा कंत्राटदाराच्या माध्यमातून मिळणार शालेय गणवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच दोन मोफत गणवेश दिले जातात. आतापर्यंत समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश पुरविण्यात येत होता. पण यंदा शिक्षण विभागाने नवा पायंडा पाडला असून गणवेश पुरविण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. दोनपैकी एक गणवेश कंत्राटदाराच्या माध्यमातून तर एक समग्र शिक्षा अभियानातून दिला जाणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱया गणवेशाबाबत नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आज झालेल्या बैठकीत दोन गणवेश उपलब्ध करून देण्याची विभागणी करण्यात आली असून त्यातील एक गणवेश हा समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि दुसरा हा कंत्राटदारांच्या माध्यमातून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एक गणवेश लगेच मिळणार असला तरी दुसऱया गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या कंत्राटदारांच्या मर्जीनुसार ताटकळत बसावे लागणार आहे.