एक नेता गेला तर त्याच्यासारखे लाख नेते पक्षात तयार करू, दगाबाजांना ममता बॅनर्जींनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षात असणाऱया भाजपने फोडाफोडीच राजकारण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या संपर्कात असलेल्यांनी खुशाल जावे. एक नेता गेला तर त्याच्यासारखे लाख नेते पक्षात तयार करू शकते, असे म्हणत तृणमूलमधील दगाबाजांना त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

प. बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसमधील नाराज मंत्री व आमदारांना गळास लावण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच परिवहनमंत्री शुभेंदू अधिकारी हे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारबाहेर पडले आहेत. आमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याची गंभीर दखल घेत ममता बॅनर्जी यांनी पक्षात अधिक पडझड होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच वेळी त्यांनी पक्षविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, असा इशारा पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन दिला आहे.

पक्षांतर्गत बंडाळी थोपविण्याचा प्रयत्न

परिवहनमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा तृणमूल काँग्रेससाठी एक मोठा धक्का आहे. त्यांच्या नाराजीमुळे पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होऊ नये यासाठी ममता बॅनर्जी यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. शुभेंदू यांचे वडील खासदार शिशिर अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना पक्षविरोधी कारवाया व संघटनेतील विरोध संपविण्यास सांगितले आहे.