शिंदे गटात गेलेल्यांना पराभवाची चिंता; भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी धडपड, विदर्भात गुप्त बैठक झाल्याची चर्चा

शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांना आता परभवाची चिंता लागलेली आहे. मतदारसंघात फिरल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या निराशेने खासदारांना चिंता लागली आहे. शिंदे गटाकडून निवडणूक लढवल्यास पराभव होईल अशी भीती बाहेर पडलेल्या खासदारांना सतावत आहे, असे वृत्त आहे. त्यामुळेच शिंदे गटाकडून निवडणूक न लढवता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

विदर्भात एका ठिकाणी पार पडलेल्या गुप्त बैठकीत पुढील निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्यावर या खासदारांचे एकमत झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. त्यामुळे शिंदे गटाचं भवितव्य काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपलाही चिंता

शिंदे गटाने भाजपकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केल्याने भाजपमध्येही नाराजी आहे. शिंदे गटातून आलेल्यांना तिकीट दिल्यास भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपलाही चिंता सतावत आहे.