मुंबई विद्यापीठातील लाखो उत्तरपत्रिका जळून खाक होण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विद्यापीठातील लाखो उत्तरपत्रिका कोणत्याही क्षणी जळून खाक होण्याचा धोका आहे. उत्तरपत्रिका ठेवण्यात येतात तेथील यूपीएस सिस्टमवर भार आल्याने शॉर्टसर्किट होऊन आज आग लागली होती. त्यामुळे या धोक्याचा अंदाज आला. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या निष्काळजीमुळे उत्तरपत्रिकांना आगीचा धोका मात्र कायम आहे.

विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नॉलॉजी इमारतीत उत्तरपत्रिका ठेवण्यात येतात. लाखोंच्या संख्येने उत्तरपत्रिका तिथे आहेत. त्यांची ऑनलाईन तपासणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र यूपीएस सिस्टीम आहे. या यूपीएस सिस्टीमला आग लागून धुराचे लोळ उठले. सुरक्षारक्षकांच्या ते लक्षात येताच अग्निशमन यंत्रे आणण्यासाठी त्यांची धावपळ उडाली. परंतु ग्रीन टेक्नॉलॉजी इमारतीत एकही अग्निशामक नसल्याने शेजारच्या इमारतीमधून त्यांना आणावे लागले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाडय़ाही तिथे पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल देवरूखकर-शेठ आणि शशिकांत झोरे यांना आगीचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्या वेळी तिथे परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे, विनोद पाटील आदी अधिकारीही होते. या आगप्रकरणी चौकशी करण्याची मागणी युवासेनेने कुलगुरूंकडे केली आहे.