रिकाम्या खुर्च्यांमध्ये मिंधे सरकारच्या महासंस्कृतीचे उद्घाटन

खुर्च्या रिकामी राहिल्या तरी चालतील. स्वप्रसिद्धीसाठी जनतेचा पैसा उधळायचा हे मिंधे सरकारने ठरवूनच टाकल्याचेच दिसून येत आहे. सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव 2024 चे आयोजन काळाचौकी येथे करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगीच हजारो खुर्च्या रिकामी राहिल्या होत्या. त्या रिकामी खुर्च्यांसमोरच निवडक लोकांच्या साक्षीने मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले.

काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात आजपासून 26 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव होणार आहे. आज सायंकाळी त्याचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोषल आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती, पण समोरच्या खुर्च्यांवर माणसेच नव्हती. प्रचंड गर्दी होईल या अपेक्षेने मैदानात हजारो खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या आणि व्यासपीठामागे भव्य स्क्रीन उभारण्यात आली होती. पण कार्यक्रम पाहण्यास माणसेच नव्हती. नाइलाजास्तव केसरकर यांना रिकाम्या खुर्च्यांकडे पाहून भाषण करावे लागले.