मंत्रालयात धमकीचा फोन करणारा अटकेत 

मंत्रालय नियंत्रण कक्षात घातपाती कारवाईचा फोन करणाऱ्या वृद्धाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. प्रकाश खेमानी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.

नुकताच मुंबईत रेल्वेत बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री मंत्रालय नियंत्रण कक्षात एक फोन आला. येत्या दोन दिवसांत मंत्रालयात घातपाती कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल घेतली. याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. फोन करणारी व्यक्ती कांदिवली परिसरात राहत असल्याचे समजले. कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांना धमकीचा फोन करणाऱयाची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी एका सोसायटीतून प्रकाशला ताब्यात घेतले. प्रकाश हे ज्येष्ठ नागरिक असून ते एकटेच राहतात. त्याने नेमका कोणत्या हेतूने फोन केला हे स्पष्ट झाले नाही.