विदेशी चलनाच्या नावाखाली फसवणूक करणारे तिघे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुनी ओळख सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयातून 24 लाख रुपयांचे विदेशी चलन घेऊन गेलेल्या तिघाना मालाड पोलिसांनी अटक केली. हनुवंत चैन सिंग, गंगा बिका सिंग आणि दुरखा सिंग भूर सिंग अशी त्या तिघांची नावे असून ते पोलीस कोठडीत आहेत.

तक्रारदार हे व्यावसायिक असून मालाड येथे त्याचे फॉरेक्सचे कार्यालय आहे. गेल्या महिन्यात तक्रारदाराना फोन आला होता. फोन करणाऱ्याने आपला 12 वर्षांपूर्वी व्यवहार झाला होता, तेव्हा आपली भेट झाली होती असे सांगून विश्वास संपादन केला. आपल्याला काही युरो ची गरज असून त्याच्या मोबदल्यात भारतीय चलन देऊ असे सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी दोन जण तक्रारदाराच्या कार्यालयात आले. मालकाचे राजस्थान येथील मित्र असल्याचे सांगितले. आपला तिसरा सहकारी हा वाहतूक कोंडीत अडकला असून त्याच्याकडे भारतीय चलन असल्याचे सांगून 24 लाख रुपयांचे 27 हजार 500 युरो घेतले. युरो घेऊन ते दोघे पळून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी मालाड पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल. तुतारे, पवार, जाधव, चुंडीवार यांच्या पथकाने तपास सुरु केला. ते तिघे राजस्थान मध्ये असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली. मालाड पोलिसांच्या विशेष पथकाने तिघाना अटक करून 11 हजार 300 युरो जप्त केले.