
कोरोनाच्या लाॅकडाऊनचा फायदा घेऊन चोरटे चोरी करायला गावात घुसल्याच्या अफवेने जमावाने तिघांना ठार केल्याची घटना डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे घडली आहे. गडचिंचले येथे गुरूवारी रात्री उशिरा एक इको गाडी गडचिंचले येथून चालली होती. या गाडीतून चोर गावात घुसले आहेत अशी अफवा पसरली आणि जमावाने या गाडीवर अमानुष हल्ला चढवला. स्थानिक पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने लाठ्या काठ्या आणि तुफान दगडफेक करून इको गाडीतील चालकासह तिघांनाही ठार केले. जमाव इतका बेभान झाला होता की त्यांनी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला चढवला होता. हे प्रवासी खानवेल येथून त्र्यंबकेश्वर येथे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



























































