सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी उखडणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारूच्या नशेत किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीचे दगड उखडून टाकणाऱ्या गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील रमेश बसगोंडा पाटील, दिपक शिवाजी संभाजी, संजय ज्योत्याप्पा पाटोळे या तिघांविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सेक्शन 3 तसेच भा.द.वि. कलम 427 (34) अन्वये मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, किल्ले सिंधुदुर्गची तटबंदी उखडणाऱ्या या तिघांना सीआरपीसी ऍक्ट 41 (अ) (1) अन्वये नोटीस देण्यात आली असून या गुन्ह्याच्या कामी तपास करतेवेळी पोलीस स्थानकात हजर राहावे असे नोटीसी द्वारे बजावण्यात आल्याची माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी दिली आहे.

मालवणात पर्यटनासाठी कोल्हापूर गडहिंग्लज येथून आलेले तीन पर्यटक गुरुवारी मद्यधुंद अवस्थेत सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले असता त्यांनी किल्ल्यावरील राणीची वेळ येथील तटबंदीचे दगड उखडून टाकण्याचा प्रकार केला होता. हा प्रकार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक सूरज भोसले व रोहन भोसले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचे याबाबत लक्ष वेधताच सायंकाळी मालवण पोलिसांना पाचारण करून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या पर्यटकांना मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर याबाबत पुरातत्व विभागाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा त्या तिघा पर्यटकांविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या पर्यटकांना समज व नोटीस देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस सुभाष शिवगण हे करत आहेत.