प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघा क्रिकेटपटूंवर क्रिकेटबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

19 वर्षांखालील संघाचे कोच वेंकटरामन यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या गंभीर आरोपामुळे पुद्दुचेरी क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुद्दुचेरी क्रिकेट संघटनेने आपल्या प्रथम श्रेणीतील तीन क्रिकेटपटूंवर तत्काळ निलंबनाची कारवाई करत कठोर पाऊल उचलले आहे. जे. कार्तिकेयन, ए. अरविंदराज आणि एस. संतोष कुमारन या तिघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सेदुरपेट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 100/2025 अंतर्गत आरोपपत्र सादर झाले आहे आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

ही तिन्ही नावे काही साधी नाहीत. त्यांनी रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडकात पुद्दुचेरीचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील या गंभीर घटनेने त्यांच्या कारकीर्दीवर काळी सावली टाकली आहे.

पुद्दुचेरी क्रिकेट संघटनेने घेतलेला निर्णय अत्यंत कठोर असून या तिघांवर संघाच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना संघाच्या कोणत्याही सुविधा वापरण्याची परवानगी नाही आणि देशांतर्गत तसेच परदेशातील कोणत्याही स्पर्धेत खेळण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. न्यायालयाकडून सर्व आरोपांतून निर्दोष सुटका होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

तरीही या तिघांकडे संघटनेच्या आचारसंहिता अधिकारी किंवा लोकपाल यांच्याकडे अपील करण्याचा पर्याय खुला आहे. मात्र सध्या तरी त्यांच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग दाटले असून एका चुकीच्या हिंसक खेळीने त्यांना थेट क्रिकेटविश्वातून बाहेर ढकलण्याच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे.