मॉर्निंग वॉक करणाऱ्या तिघांना भरधाव मोटारीने उडविले, सासू-सासऱ्यांसह सुनेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले, तर सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बबन नाना धायगुडे (वय 70), शांताबाई बबन धायगुडे (वय 64), सारिका भगवान धायगुडे (वय 34, सर्व रा. शेळके वस्ती, खंडाळा) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.

लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगेमळानजीक आज पहाटे बबन धायगुडे त्यांच्या पत्नी शांताबाई आणि सून सारिका हे मॉर्निंग वॉक करीत खंडाळ्याकडे निघाले होते. यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडविले.

यामध्ये बबन धायगुडे आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर सारिका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या वाहनाने धडक दिली त्याचा बंपर व नंबर प्लेट घटनास्थळी आढळून आली आहे. पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी पंचनामा केला.