
राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज मंदिरात चोरटय़ांनी तीन दानपेटय़ा फोडून त्यामधील हजारो रुपयांवर डल्ला मारलाय. 12 मार्च रोजी सकाळी मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे संत कवी महिपती महाराज यांचे मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. 11 मार्च रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान मंदिरातील पुजारी घरी निघून गेल्यानंतर चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी चोरटय़ांनी मंदिरातील तीन दानपेटय़ा व सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर चोरून नेला. परिसरातील नागरिकांनी मंदिर परिसरात शोध घेतला असता, एक दानपेटी मंदिराच्या आवारात दिसून आली, तर दोन दानपेटय़ा मंदिरामागील परिसरात फोडलेल्या अवस्थेत मिळून आल्या. चोरटय़ांनी तीन दानपेटय़ांमधील अंदाजे 15 हजार रुपयांची रोख रक्कम व 3 हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही फुटेजचे चित्रीकरणाचे स्टोअरेज करणारे डीव्हीआर असा एकूण 18 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे.
संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी सुभाष लक्ष्मण मुंढे हे 12 मार्च रोजी सकाळी 6 वाजता मंदिरात आले असता मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र रावसाहेब साबळे (रा. रामपूर, ता. राहुरी) यांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राहुरी येथील पोलीस पथकाने पाहणी केली. राजेंद्र साबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे तपास करीत आहेत.
























































