एनसीबीची दक्षिण मुंबईत कारवाई, तीन पेडलरकडून केले ड्रग्ज जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने दक्षिण मुंबईत कारवाई करून तीन ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळल्या. मोह्हमद शोएब हैदर खान, इकरा अब्दुल गफार आणि रिझवान इस्माईल खान ऊर्फ बटलर अशी त्या तिघांची नावे आहेत. इकरा ही ड्रग्ज तस्कर चिकू पठाणची साथीदार असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.

‘एनसीबी’ने गेल्या काही दिवसापासून मुंबईत कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. दक्षिण मुंबईत काही पेडलर हे सक्रिय असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली. त्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने डोंगरी, नागपाडा परिसरात कारवाई केली. एनसीबीने डोंगरी येथे कारवाई करून शोएब खानला ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही ड्रग्ज जप्त केले. शोएबविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार तीन गुन्हे दाखल आहेत. तो दोनच दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर येताच तो ड्रग्जची तस्करी करू लागला होता असे ‘एनसीबी’चे म्हणणे आहे. तर ‘एनसीबी’ने चिंचबंदर येथे कारवाई करून रिझवान इस्माईल खान ऊर्फ बटलरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ‘एनसीबी’ने काही चरस जप्त केले.

कोडवर्डचा करायची वापर
‘एनसीबी’ने दोन टाकी परिसरात कारवाई करून इकरा कुरेशी या महिलेला अटक केली. तिच्याकडून एनसीबीने 22 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. इकरा ही ड्रग्ज तस्करीसाठी कोडवर्डचा वापर करायची. एमडीसाठी ‘दवा’ आणि एलसीडीसाठी ‘पेपर’ हे तिचे कोडवर्ड होते. कोडवर्ड असणाऱयांना ती ड्रग्ज देत असून ती दक्षिण मुंबई ते वांद्रे परिसरात ड्रग्ज तस्करीत सक्रिय होती. इकरा ही ‘एनसीबी’ने अटक केलेल्या चिंकू पठाणची साथीदार आहे. तिच्याविरोधात गेल्या वर्षी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या