
पंजाबमधून ऑस्ट्रेलियाला निघालेल्या तीन तरुणांचे इराणच्या तेहरान येथून अपहरण करण्यात आले आहे. या तिघांना पंजाबमधील एका एजंट ऑस्ट्रेलियाला पाठवणार होता. मात्र तो एजंट त्यांना इराणला घेऊन गेला व तेथील तेहरान विमानतळावरून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे.
हुशनप्रीत सिंग (संगरूर), जसपाल सिंग (एसबीएस नगर) आणि अमृतपाल सिंग (होशियारपूर) अशी त्या तीन तरुणांची नावे असून ते 1 मे पासून तेहरानमधून बेपत्ता झाले आहेत. या तरुणांच्या कुटुंबियांनी भारतीय दूतावासाला याबाबत कळवले असून सध्या त्या तिघांचा शोध घेण्यात येत आहे.
पंजाबमधील एका एजंटने तिघांना दुबई-इराण मार्गाने ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही कारणास्तव त्याने त्यांना इराणमध्ये काही दिवस थांबावे लागणार असे सांगितले. त्यामुळे ते तेहरानला पोहोचले. मात्र तेहरानला पोहचल्यानंतर त्यांचा कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नाही. दरम्यान तरुणांच्या कुटुंबियांनी त्यांना अपहरणकर्त्यांनी त्यांचा व्हिडीओ पाठवल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओत तिन्ही तरुणांना पिवळ्या दोरीने बांधलेले दिसत असून त्यांच्या शरिरावर जखमा आहेत.