
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीदिवशी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या तीन कश्मिरी विद्यार्थ्यांना चोप देण्यात आल्याची घटना घडली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील हुबळी येथे हा प्रकार घडला. हे तिन्ही तरुण केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीला या तिघांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणांचा त्यांनी एक व्हिडीओही बनवला. तो व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतलं. पण, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतेवेळी काही जणांच्या जमावाने या तिघांना चोप दिला. पोलिसांच्या तावडीतून त्यांना सोडवून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हुबळी धारवाड येथील पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

























































