आरटीई प्रवेशासाठी तीन लाख अर्ज; अर्ज करण्याची मुदत वाढवली

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱया 25 टक्के आरटीई प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 17 मार्च रोजी संपली, मात्र पालकांच्या मागणीनुसार अर्ज सादर करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असून या जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून तब्बल 3 लाख 14 हजार 731 प्रवेश अर्ज आले आहेत. शिक्षण संचालनालयाने अर्ज सादर करण्याची मुदत 25 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत वाढवल्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

पुणे जिह्यातील 15,655 जागांसाठी 68,192 अर्ज

आरटीईच्या पुणे जिह्यातील 15 हजार 655 जागांसाठी तब्बल 68 हजार 192 विद्यार्थ्यांचे अर्ज आले. ठाणे जिह्यातून 27 हजार 665, मुंबई विभागात आतापर्यंत 15 हजार 787 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.