
कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर येथील अभ्युदय बॅंकेच्या एटीएम मशीनमधील तीन लाख सात हजार रुपयांची रोकड तिघा अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून नेहरूनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नेहरूनगर येथील अभ्युदय बॅंकेच्या शाखा मुख्य व्यवस्थापकाने याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बॅंकेच्या आवारात असलेल्या एटीएम सेंटरमध्येच ही घटना घडली. तिघा अज्ञात आरोपींनी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएम मशिनचा खालच्या बाजूला असलेला दरवाजा उघडून तीन लाख सात हजार रुपयांची रोकड व एक कॅसेट बॅगेत भरून चोरून नेली.




























































