नगरमधील बेपत्ता तीन मुली हैदराबाद येथे सापडल्या, एका मुलीवर अत्याचार केल्याचे उघड

तीन दिवसांपूर्वी नगर शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. त्या बेपत्ता तीनही मुली हैदराबाद येथे सापडल्या. पोलीस चौकशी केल्यानंतर मुलींकडून धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात तीनपैकी एकीवर अत्याचार झाला असून, अत्याचार करणाऱया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नगर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमनाथ ऊर्फ ऋषिकेश एकनाथ हापसे (रा. उंबरे, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. मंगळवार (दि.12) रोजी एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली शहरातून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. या तिघींच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. तपास सुरू असतानाच, पोलिसांना या मुली हैदराबादला त्यांच्या काकांकडे असल्याचे कळाले. पोलिसांनी तेथून मुलींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.

मंगळवारी तीनही मुली शाळेत जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या. परंतु त्या शाळेत न जाता मित्रांसोबत डोंगरगणला फिरायला गेल्या. फिरून आल्यानंतर या मुली घरी न जाता सिद्धीबाग येथे थांबल्या. त्यावेळी मित्रांनी घरी जाण्याची विनंती करूनही त्या घरी गेल्याच नाहीत. घरी जायची भीती वाटते, आमची राहण्याची सोय करा, असे त्यांनी मित्रांना सांगितले. त्यावर संबंधित मित्रांनी त्यांना ते शक्य नसून, आपल्या घरी जाण्यास सांगितले.

यादरम्यान आरोपी सोमनाथ हापसे हा कारमधून तेथे आला. मी चाइल्ड लाइनचे काम करतो, असे सांगून पीडित मुलींना तो राहत असलेल्या बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे भाडोत्री खोलीत घेऊन गेला. त्यांना काहीतरी आमिष दाखवून यातील एका मुलीवर अत्याचार केला. तर दुसरीची छेड काढली. दुसऱ्या दिवशी हापसे याने या मुलींना नगरच्या रेल्वेस्थानकावर सोडत पैसे देऊन रेल्वेने हैदराबाद येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या तिघी हैदराबाद येथे गेल्या.

पोलिसांनी त्यांना नगरला आणले असून, त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानंतर सर्वच चक्रावले आहेत. तिघींपैकी एकाच्या जबाबावरून आरोपी हापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.