
जगातील 57 पेक्षा जास्त देशात वेगाने पसरणाऱया ओमायक्रोनचे पाच रुग्ण सापडल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. मात्र, या रुग्णांपैकी तिघा जणांनी ओमायक्रोनवर मात केल्याने त्यांना आज सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूने जगाला चिंतेत टाकले असताना मुंबई विमानतळावर 12 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत उतरलेल्या 6 हजार 466 प्रवाशांपैकी आतापर्यंत केवळ 5 प्रवाशांना ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यांच्यावर पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना आज घरी जाऊ देण्यात आले. उर्वरीत दोन रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
आतापर्यंत 56 प्रवासी कोरोनाबाधित
मुंबईत आतापर्यंत युरोप आणि आफ्रिकेतील देशांतून 12 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत 6 हजार 477 प्रवासी आले असून या सगळ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आतापर्यंत त्यात 56 प्रवासी कोरोनाबाधित आढळले. यापैकी 5 प्रवाशांना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली होती. 5 रुग्णांपैकी दोन रुग्ण मुंबईबाहेरचे आहेत. या सगळ्यांची पुन्हा जिनम सिक्वेसिंग चाचणी केली असता यापैकी 3 जणांनी ओमायक्रोनवर मात केल्याने तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- विमानतळावर कोरोनाबाधित आढळलेले प्रवासी – 10
- सर्वेक्षणात कोरोना निदान झालेले प्रवासी – 34
- कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले – 12
































































