
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना हे तिघे पैशांच्या मोबदल्यात महत्त्वाची संवेदनशील माहिती पुरवत होते. एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने ही माहिती दिली. श्रीगंगानगर, हनुमानगड आणि चुरू या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन हिफाजत अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 23 संशयितांची संयुक्तपणे चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान हनुमानगढ येथील अब्दुल सत्तार, गंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथील नितीन यादव आणि चुरूचा राम सिंह हे तिघेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे आढळून आले.
हे तिघे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना महत्त्वाची संवेदनशील माहिती देत होते आणि या कामाच्या बदल्यात पाकिस्तानी हस्तकांकडून पैसेही घेत होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार हनुमानगढचा रहिवासी अब्दुल सत्तार 2010 पासून नियमितपणे पाकिस्तानात जात होता. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा स्थानिक एजंट म्हणून काम करत होता. चौकशीदरम्यान अब्दुल सत्तारने कबूल केले की हिंदुस्थानात आल्यानंतर तो पाकिस्तानी हँडलर्सच्या सतत संपर्कात होता आणि देशातील महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे शेअर करत होता.
सुरतगडचा रहिवासी असलेला नितीन यादव हा पाकिस्तानी महिला एजंटच्या हनीट्रॅपमध्ये अडकून सुरतगड आणि महाजन फील्ड फायरिंग रेंज येथील महत्त्वाची माहिती देवून पैसे मिळवत होता. अधिका-याने सांगितले की, या तिघांच्या मोबाईल फोनमध्ये काही महत्त्वाची व हिंदुस्थानात ज्यावर बंदी आहे अशी माहिती सापडली आहे. या तिघांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हँडलरला ही माहिती दिली. त्यांनी या महत्त्वाच्या माहितीच्या बदल्यात पैसे घेतल्याचे पुरावेही सापडले आहेत. तिघांची सखोल तांत्रिक चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शासकीय गुप्तता कायदा 1923 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

























































