
मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला असताना गोवंडीत गोवर संशयित तीन मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची तपासणी पालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि ताप, अंगावर चट्टे-ओरखडे, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पालिकेडून वर्षभर गोवर तपासणीसाठी शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्यानुसार जानेवारीपासून मुंबईभरात 90 बाधित आढळले आहेत. यामध्ये एकटय़ा एम/पूर्व गोवंडी विभागात सर्वाधिक लागण झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी गोवर संशयित तीन आणि पाचवर्षीय दोन सख्ख्या भावंडांसह त्यांच्याच एका पाचवर्षीय चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. गोवंडीत तब्बल 23 जणांना गोवरची लागण झाली आहे, तर एफ/उत्तर वडाळा, एम/पश्चिम चेंबूर, जी/उत्तर दादर-धारावी-माटुंगा, पी/उत्तर मालाड आणि एल वॉर्ड कुर्ल्यातही गोवरबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कुठल्याही ठिकाणच्या मुलांना लक्षणे दिसून आल्यास पालिकेशी संपर्क करावा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
नवव्या, सोळाव्या महिन्यात लसीकरण
गोवरची लागण टाळण्यासाठी मुलांना नवव्या महिन्यात आणि सोळाव्या महिन्यात गोवर प्रतिबंधक लसीकरण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे या वयोगटातील मुले असल्यास आणि लसीकरण झालेले नसल्यास लसीकरण करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. शिवाय दर सहा महिन्यांनी जंतनाशक औषधही द्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
210 हेल्थ सेंटरकडून तपासणी
पालिकेच्या माध्यमातून 210 हेल्थ सेंटरच्या माध्यमातून गोवरच्या तपासणीसाठी पालिकेकडून शिबिरे भरवण्यात येतात. मंगळवार आणि शनिवारी ही शिबिरे होतात. एका हेल्थ सेंटरकडून महिनाभरात 16 शिबिरे आयोजित करण्यात येतात. यामध्ये 8 शिबिरे फिल्डवर तर 8 शिबिरे हेल्थ सेंटरमध्ये आयोजित केली जातात. त्यामुळे अशा ठिकाणी मुंबईकरांनी आपल्या मुलांची गरजेनुसार तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. हेल्थ सेंटरमार्फत वर्षभरात सुमारे 44 हजार शिबिरे घेतली जातात.
केंद्र सरकारची उच्चस्तरीय टीम मुंबईत दाखल
गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. या टीमकडून गोवर प्रादुर्भावाबाबत आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही टीम मुंबईत पाठवली आहे. गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आकलन व व्यवस्थापनाचे काम ही टीम करणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय, व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलच्या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाला ही टीम सहाय्य करेल. ही टीम तपासणी करण्यासाठी विविध भागांत भेटीही देणार आहे.































































