कश्मीर हादरले; दीड तासात तीन दहशतवादी हल्ले, पंडितासह तिघांची गोळ्या झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मिरात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी धुडगूस घातला. अवघ्या दीड तासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कश्मिरी पंडितासह फेरीवाला आणि टॅक्सी युनियनचा अध्यक्ष अशी तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहशतवादी संघटना ’द रेसिस्टेंस पर्ह्स’ने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तोएबाशी संबंधित संघटना आहे.

काश्मिर खोऱयात दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांची मेडिकलमध्ये घुसून निर्घृण हत्या केली. 68 वर्षांचे बिंद्रू यांनी नव्वदच्या दशकातील भयंकर परिस्थितीतही कश्मीर सोडले नव्हते. दुसरीकडे अवंतीपोराच्या लाल बाझार भागात मूळचा बिहारचा रहिवासी असलेला फेरीवाला वीरेंद्र पासवानची हत्या करण्यात आली. तिसरा हल्ला बांदीपोरामध्ये झाला. यात टॅक्सी युनियनच्या अध्यक्षाला गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. मोहम्मद शफी लोन असे त्याचे नाव आहे. अवघ्या दीड तासात लागोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी कश्मीर हादरले असून सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

नायब राज्यपालांसह राजकीय पक्षांनी केला हल्ल्याचा निषेध

z नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनांबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असे सांगितले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनीही हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. तसेच पीपुल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांनी काश्मिरी पंडित बिंद्रू यांच्या हत्येचा निषेध केला. बिंद्रू यांच्यावरील हल्ला खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला आहे.

लपून काय गोळ्या झाडता, हिंमत असेल तर पुढे या! कश्मिरी पंडिताच्या मुलीचे दहशतवाद्यांना आव्हान

z हल्ल्यात मारले गेलेले कश्मिरी पंडित बिंद्रू यांची मुलगी डॉ. श्रद्धा बिंद्रू यांनी दहशतवाद्यांना थेट आव्हान दिले आहे. लपूनछपून काय गोळ्या झाडता, हिंमत असेल तर पुढे येऊन भिडा, अशा शब्दांत आव्हान देत श्रद्धा हिने दहशतवाद्यांच्या कृत्याचा धिक्कार केला आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या शरीराला मारले आहे, परंतु त्यांचा आत्मा अमर आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया तिने दिली. बिंद्रू हे श्रीनगरचे प्रमुख केमिस्ट होते. त्यांचा परिवार तीन पिढय़ांपासून श्रीनगरमध्ये औषधांचा व्यवसाय करत आला आहे.