ठाणे जिह्यातील तीन हजार वृक्षांना जीवदान

सामना ऑनलाईन । ठाणे

रस्ता चौपदरीकरण करण्याचा चंग बांधणार्‍या ‘एमएमआरडीए’ला भिवंडीतील स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या रुंदीकरणामुळे हजारो वृक्षांवर कुर्‍हाड चालवली जाणार असून पर्यावरणवादी संस्थांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली आहे. स्थानिकांच्या विरोधापायी  रुंदीकरणाचे काम करण्यात येणार नाही अशी कबुली एमएमआरडीएने हायकोर्टात दिल्यामुळे ठाणे जिह्यातील 3 हजार 27 वृक्षांना जीवदान मिळणार आहे. भिवंडी येथील शिरसाड-अंबाडी मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून एमएमआरडीएकडून वृक्षांची कत्तल करण्यात आली. याप्रकरणी ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेने हायकोर्टात धाव घेऊन ऍड.जमान अली यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती  शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत एमएमआरडीएतर्फे प्रतिज्ञापत्र सादर केले. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात येत असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली. हायकोर्टाने हे प्रतिज्ञापत्र स्वीकारून याबाबतची याचिका निकाली काढली.